Saturday, June 6, 2009

शाश्वत

ध्यानात एकतान आणि निर्विकार झालेलं त्याचं मन हळूहळू भानावर आलं तेव्हा सूर्य पश्चिमेकडे कलला होता. पश्चिमेकडून येणारा शीतल वारा, घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांची किलबिल आणि सूर्याच्या लालीत न्हाऊन गुलाबी झालेली समोरची हिमशिखरे या सगळ्यामुळे वातावरणात एक उल्हास भरून राहिला होता. त्याने मात्र अत्यंत तटस्थपणे आपले मृगाजिन आवरले आणि शिळेवरून खाली उतरून रात्र काढण्यासाठी आसपासच्या वृक्षांखाली सोयीस्कर जागा शोधू लागला. इतकावेळ कठोरपणे विचारांपासून अलिप्त ठेवलं गेलेलं त्याचं मन नव्या उत्साहाने विचारांच्या जंगलात शिरून माकडासारखं एका विचाराहून दुसऱ्या विचारावर उड्या मारु लागलं. त्याचं ईप्सित ठिकाण आता अगदी जवळ आलं होतं. संपूर्ण आयुष्य ज्या गोष्टीचा ध्यास घेतला ती आता जणू हाताच्या अंतरावर आली होती. उद्या आपल्या आयुष्यातला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रवास आहे या जाणिवेने त्याने इतक्या वर्षांच्या साधनेने मिळवलेली तटस्थता काहीशी भंगल्यासारखी झाली. वर्षानुवर्षाच्या मिताहाराने आणि कठोर आत्मसंयमनाने तेजाळ झालेल्या त्याच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव उमटले नाहीत. जवळ जवळ असलेल्या दोन-तीन वृक्षांनी मिळून झालेल्या एका बेचक्यात जराशी मोकळी जागा पाहून त्याने ती एका फांदीने स्वच्छ करायला सुरुवात केली. झाडाच्या खोडाकडे पाहताना का कोण जाणे पण एकदम बेसावधपणे त्याच्या मनात त्याच्या बायकोची आठवण जागी झाली. क्षणार्धासाठी वाऱ्याच्या झुळकीत त्याला बायकोच्या श्वासाचा भास झाला आणि झाडाच्या खोडात तिची आकृती चमकून गेली. त्याने फांदी टाकून दिली आणि कपाळावर आठी घालून झाडाला टेकून बसला. शेवटच्या टप्प्यात आपलं हे असं व्हावं याचा त्याला फार राग आला आणि तो पुन्हा मन एकाग्र करायचा प्रयत्न करु लागला. तरी घर सोडून इतक्या वर्षानी तिची आठवण व्हावी याचं आश्चर्य चुकारपणे त्याच्या मनात रेंगाळलंच.
मन स्थिर करुन त्याचा श्वास एका लयीत येतो न येतो तोच पावलांच्या आणि धापा टाकल्याच्या आवाजाने त्याचं लक्ष विचलीत झालं. वळून पाहिलं तर चार-सहा धट्टेकट्टे पुरुष एक मेणा घेउन येताना दिसले. चढ संपवून सपाटीला येताच त्यांनी अलगदपणे मेणा जमिनीवर ठेवला आणि डोक्याची मुंडाशी काढून ते घाम पुसू लागले. क्षण दोन क्षणातच मेण्याचे पडदे बाजूला झाले आणि आतून एक दागिन्यांनी मढलेला तुंदीलतनू वृद्ध अवतीर्ण झाला. त्याच्या रेशमी कपड्यांतून आणि हिरेमाणकानी मढलेल्या दागिन्यांतून श्रीमंती उतू चालली होती आणि सर्व भोग घेउन दमल्याप्रमाणे त्याचे डोळे आणि चेहरा तुपटपणे ओघळला होता. बाहेर येऊन उभा राहताच त्या वृद्धाने हात उंचावून आळस दिला आणि मग एकदम कंटाळा आल्यासारखे हात खाली सोडून दिले. तेवढ्या हालचालीने त्याचं गरगरीत आणि थुलथुलीत पोट थरथरलं आणि त्याचा रेशमी अंगरखा थोडावेळ वर सरकल्यासारखा होऊन हळूहळू खाली घसरला. इकडे तिकडे पाहताना त्या वृद्धाचं लक्ष त्याच्याकडे जाताच अभावितपणे त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. तो वृद्धही प्रतिसादादाखल हसला आणि भोयांना उद्देशून काहीतरी बोलून त्याच्यादिशेने चालू लागला.
जवळ येताच वृद्धाने दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला आणि सावकाशपणे त्याच्या समोर बसला.
"मी विष्णुदास शर्मा. मथुरेहून आलोय. अंबरनाथाच्या मंदीराकडे चाललोय". विष्णुदासच्या आवाजात आणि बोलण्यात एक श्रीमंती आब तर होताच शिवाय एखाद्या कर्तबगार आणि आत्मविश्वासपूर्ण पुरुषाप्रमाणे त्याचं बोलणं वजनदार होतं.
“मी ही अंबरनाथाच्या मंदीराकडेच चाललो आहे.”, तो म्हणाला. मात्र हा लठ्ठ वृद्ध अंबरनाथाच्या मंदीराकडे निघाला आहे हे ऐकून वाटलेलं आश्चर्य लपवून ते वाक्य बाहेर काढण्यासाठी त्याला महत्प्रयास करावे लागले. विष्णुदास काही तरी समजल्यासारखं हसला. एखाद्या व्यवहारचतुर आणि बेरकी व्यापाऱ्याप्रमाणे हातातल्या पाचूच्या अंगठीशी चाळा करत तो पुन्हा बोलू लागला, "आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की माझ्यासारख्या सामान्य व्यापाऱ्याला अंबरनाथाच्या मंदीराबद्दल कसं कळालं.".
अभावितपणे त्याने मान डोलावली.
स्वत:वरच खुश होत विष्णुदास उत्साहाने सांगू लागला," गंमत आहे पाहा. आयुष्याची साठ वर्षे मी भरभरुन जगलो. अमाप पैसा कमावला. देशोदेशी फिरलो. व्यापार केला, वेगवेगळी उत्तमोत्तम पक्वान्ने चाखली, उत्तमोत्तम पेयांचा आणि मद्याचा आस्वाद घेतला, एकाहून एक सुंदर स्त्रिया भोगल्या, सुंदर आणि मौल्यवान रत्नांचा संग्रह केला. सगळं काही मजेत चाललं होतं. पण गेल्या पाच वर्षांपासून सगळ्याची चव गेल्यासारखं झालं. कशातच मन रमेना. मृत्युची चाहूल लागताच आयुष्याचा अर्थ शोधायची मला निकड भासू लागली. मग मी चारी दिशाना माणसं पाठवली आणि मोठमोठ्या ऋषीमुनीना पाचारण करून त्याना आयुष्याचं प्रयोजन विचारु लागलो. कोणीच माझं समाधान होईल असं उत्तर देऊ शकला नाही. अखेर एका विक्षिप्त साधूने मला या अंबरनाथाच्या मंदिराबद्दल सांगितलं आणि मी प्रयत्न करून पाहायचं ठरवलं."
ज्या मंदीराचा दृष्टांत मिळण्यासाठी आपल्याला पंचवीस वर्ष घोर साधना आणि अखंड वणवण करावी लागली त्या मंदीराचा पत्ता या विषयसुखात लडबडणाऱ्या सामान्य मनुष्यास केवळ पाच वर्षात मिळावा याचं त्याला थोडं वैषम्य वाटलंच पण सरावाने आलेल्या सहजतेने त्याने ती भावना मनातून हद्दपार केली. त्याची कथा विष्णुदासाच्या अगदी विरुद्ध होती. समज येताच त्याला आयुष्याबद्दल अनेक प्रश्न भेडसावू लागले. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने अनेक ग्रंथ वाचले. अनेक विद्वानांशी चर्चा केली, शिष्यत्व पत्करलं पण त्याच्या बुद्धीला पटेल असं उत्तर त्याला मिळू शकलं नाही. लग्न झाल्यावरही त्याचं मन रमेना आणि मग त्याने घर सोडलं. पंचवीस वर्षं भटकून, अनेक गुरु करून, ध्यानधारणा करुन अखेर त्याला एक दिवस या अंबरनाथाच्या मंदीराचा दृष्टांत झाला आणि तेथे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि शाश्वत अशा सत्याचं ज्ञान आपल्याला होईल अशी त्याला खात्री पटली. मग मजल दरमजल करीत आज तो तेथे पोचला होता.
एकमेकांची माहिती देताघेता एक प्रहर उलटला. विष्णुदासाच्या भोयांनी तोपर्यंत राहुटी उभारुन अन्न शिजवले. विष्णुदासाच्या आग्रहावरुन त्याने थोडेसे अन्न खल्ले आणि राहुटीत झोपण्यास तयार झाला. थंड वातावरणात गरम अन्न पोटात गेल्याने आणि दिवसभराच्या थकव्याने सगळे लवकरच निद्राधीन झाले.
भल्या पहाटेच तो जागा झाला आणि राहुटीबाहेर आला. भोईलोक त्याच्या चाहुलीने जागे झाले आणि गडबडीने कामाला लागले. सुर्योदय व्हायच्या सुमारास विष्णुदास जागा झाला आणि डुलत डुलत बाहेर आला, तोपर्यंत त्याने स्वत:ची ध्यानधारणा आटोपली होती. आज त्याला अतिशय हलकं आणि शरीरात अद्भुत शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटत होतं. विष्णुदासाबरोबर थोडासा फराळ करून तो पुढच्या प्रवासास सिद्ध झाला. विष्णुदासाचा मेण्यात बसण्याचा आग्रह निर्धारपूर्वक मोडून तो मेण्याच्या पुढे झपाझप चालू लागला. सकाळच्या थंड हवेत त्यांनी बरंच अंतर कापलं. पण हळूहळू सूर्य डोक्यावर येउन तळपायला लागला आणि पायाखालची चढणही आणखी तीव्र होऊ लागली. सकाळी जाणवलेली ती अनामिक शक्ती हळूहळू निघून जात आहे असं त्याला वाटू लागलं. भोईलोक इतकावेळ एका लयीत "हुम हुम" असं काहीसं उच्चारत चालत होते पण आता त्यांचीही लय बिघडू लागली होती आणि मध्येच नुस्तेच सुस्कारे ऐकू येत होते. अजून मध्यान्हीला अवकाश होता तरी ही परिस्थिती झालेली पाहून तो काळजीत पडला. रात्र होण्याआधीच मंदिरात पोचणं आवश्यक होतं. त्या दुर्गम मार्गावर रात्रीचा मुक्काम करणं अशक्य होतं आणि रात्री वादळ वगैरे झाल्यास मंदिरात पोचण्यापुर्वीच मृत्युने त्यांना गाठण्याची शक्यता होती. आता सगळीकडे बर्फाचं साम्राज्य चालू झालं होतं आणि चढण संपण्याचं नाव घेत नव्हती. उन्हाचा आणि बर्फावरुन परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचा त्रास कमी होण्यासाठी तो डोळे बारीक करुन चालत होता आणि हवेतील प्राणवायूचं प्रमाण कमी झाल्याने तोंडाने जोरजोरात श्वास घेत होता. प्रत्येक पाऊल टाकल्यावर त्याला धाप लागत होती आणि थंडगार हवेने त्याचे सांधे दुखु लागले होते. इतक्यात मागून गलका झाला म्हणून त्याने वळून पाहिले तर एक भोई जमिनीवर कोसळला होता आणि जीवाच्या आकांताने श्वास घ्यायचा प्रयत्न करत होता. काही क्षणातच त्या भोयाचं तडफडणारं शरीर शांत झालं आणि बाकीचे भोई थिजल्यासारखे दगड होउन त्याच्याकडे पाहत उभे राहिले. हळूहळू भानावर येत त्यांनी मेणा खाली ठेवला आणि मेलेल्या भोयाभोवती उकिडवे बसून डोक्याला हात लावून जोरजोराने श्वास घेउ लागले. रडण्याइतकाही श्वास घेणं त्याना शक्य नव्हतं पण मृत्युची भीती त्यांच्या डोळ्यात साठलेली तेवढ्या अंतरावरुनही स्पष्ट दिसत होती. विष्णुदास खाली उतरला आणि भोयांची समजूत घालू लागला पण त्याच्याही डोळ्यात आता थोडी भीती साकार होउ लागली होती. कशीबशी त्यांची समजूत घातल्यावर आणि परत गेल्यावर दुप्पट बिदागी द्यायचं वचन दिल्यावर ते ईमानी भोई पुढे चालण्यास तयार झाले. त्या निमित्ताने थोडी विश्रांती मिळाल्याने तो थोडा हुशारला होता. पुन्हा वळून तो सर्व शक्ती एकवटून पुढे चालू लागला. विश्रांतीने आलेली हुशारी पाच-दहा पावलांतच संपली आणि पुन्हा प्रत्येक पाऊल टाकताना त्याला प्रचंड धाप लागू लागली.
थांबत थांबत एक एक पाऊल मोठ्या मुश्कीलीने चालत त्याने एका उंच सरळसोट आकाशात घुसलेल्या कड्याला वळसा घातला आणि समोरचं दृश्य पाहून जागीच रुतल्यासारखा उभा राहिला. आता तो पर्वताच्या दुसऱ्या बाजूकडे पाहत होता. समोर खूप अंतरावर आणखी एक पर्वत होता आणि त्या दोन पर्वतांच्यामध्ये सरळ खाली खोल जाणारी दरी. तो उभा असलेल्या पर्वताचा एक लांब त्रिकोणी सुळका त्या दरीवर झेपावला होता, जणू काही या पर्वताने त्या पर्वताला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात हात लांबवला होता. आणि त्या सुळक्याच्या दरीत तरंगणाऱ्या टोकावर ते होतं. ओबड धोबड, चपट्या दगडांनी रचून बनवलेलं उंच मंदीर. एकाचवेळी अतीव आनंद आणि प्राणांतिक भीती यांचं मिश्रण त्याच्या मनात कालवलं जाउ लागलं आणि तो थरथरत तसाच उभा राहिला. भोईलोक आणि विष्णुदास त्याच्या बाजूला येउन उभे राहिले हे कळायला त्याला बराच वेळ लागला. हळूहळू त्याने स्वत:ला सावरलं आणि मग तो विश्रांतीसाठी खाली बसला. विष्णुदास आणि त्याचे भोई भानावर आल्यावर त्यांनी थोडंसं खाउन घेतलं. सूर्य नुकताच मध्यान्हीवरून ढळला होता. थोडं बरं वाटल्यावर सगळे निघाले. मंदीर समोर दिसत असल्याने सगळ्यांचाच उत्साह दुणावला होता. आणखी एक प्रहरभर चालून ते त्या सुळक्याच्या सुरुवातीस पोचले. सुळका चांगलाच रुंद होता. एकाचवेळी दहा-पंधरा बैलगाड्या जातील एवढा. पण सुळक्यावरून वारा इतक्या वेगाने वाहत होता की एखाद्या नदीचा प्रपात उंचावरून खोल डोहात कोसळल्यासारखा प्रचंड ध्वनी निर्माण होत होता. जीव मुठीत धरून ते सगळे मंदीराकडे निघाले. वाऱ्याने झोकांड्या जाउ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत, केवळ मंदीरावर नजर ठेवून दरी कडे न पाहण्याचा प्रयत्न करीत ते कसेबसे मंदीराच्या दारात पोचले. मंदीर भव्य वगैरे अजिबात नव्ह्तं पण लांबून वाटलं त्यापेक्षा नक्कीच मोठं वाटत होतं. मंदीराचा दरवाजा लाकडी होता. लाकूड सागवानासारखं जड नसून देवदाराचं हलकं असावं असं वाटत होतं. दारावर कसलीही कलाकुसर नव्हती. उत्सुकतेनं थरथर कापत त्याने दरवाजा ढकलला. दरवाजा अगदी सहज ढकलला गेला आणि एकदम सताड उघडला. आतलं मात्र काहीच दिसू नये एवढा आतमध्ये ठार अंधार होता. दबकत दबकत त्यानं आत पाऊल टाकलं. बराचवेळ उभा राहिल्यावर त्याला हळूहळू अंधाराची सवय झाली आणि अंधुक दिसू लागलं. मंदीर चौकोनी होतं आणि मध्ये धुनीसारखा एक छोटा चौकोन दिसत होता. पलीकडे दरवाजाच्या विरुद्ध बाजूला एक बंद खिडकी दिसत होती. त्याने पुढे जाउन खिडकी उघडली. अर्धापुरुष उंचीची ती खिडकी उघडताच सूर्यप्रकाश आत आला आणि मंदीर बऱ्यापैकी उजळून निघालं. अतीव उत्सुकतेनं तो घाई घाई वळाला आणि इकडे तिकडे मान हलवून मंदिराचं निरीक्षण करु लागला. चपटे दगड रचून बनवल्याने मंदिराच्या भिंती आतूनही खडबडीत होत्या आणि त्यावर काही लिहिता येणं शक्य नव्हतं. जमीनही थोडीफार ओबडधोबड होती आणि त्यावरही काही चिन्ह नव्हती. खूप बारकाईने सगळीकडे पाहून झाल्यावर त्याचा चेहरा काळवंडला. विष्णुदासही दरवाजापासून थोडा आत येउन हतबुद्धपणे कमरेवर हात ठेवून उभा होता. भोई दारात उभे राहून आळीपाळीने त्यांच्याकडे आणि एकमेकांकडे पाहत उभे होते. यासाठी एवढा जीव धोक्यात घालायची काय गरज होती असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
त्याला त्याच्या पायांतलं त्राण गेल्यासारखं वाटलं आणि तो गुडघ्यांवर कोसळला. पंचवीस वर्षांची त्याची तपश्चर्या फुकट गेली होती. काही क्षण तसाच गुडघ्यांवर बसून राहिल्यानंतर तो हळूहळू खाली बसला आणि मागे सरकून खिडकीशेजारी भिंतीला टेकला. आजवर त्याने अनेक प्रयत्न केले, अनेक मार्ग धुंडाळले, कित्येक धोके पत्करले आणि प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला होता. मोठमोठ्या संत महात्म्यांची नावं ऐकून त्यांना भेटायला तो जीव धोक्यात टाकून गेला होता. त्यातले कित्येक लोक भोंदू निघाले, काहीनी पढतपंडितासारखं त्याला तेच तेच आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष वगैरेचं पुराण ऐकवलं, काही तर त्याने आधीच संपादन केलेलं ज्ञान पाहून आणि त्याचे प्रश्न ऐकून उलट त्याचेच शिष्य झाले. पण तो निराश झाला नव्हता. दरवेळी नव्या उत्साहाने तो नवीन पर्याय शोधायला निघायचा. या वेळी मात्र गडद निराशेने त्याचं मन झाकोळून गेलं. या मंदिराचा पत्ता त्याला दुसऱ्या कोणी सांगितला नव्हता तर ध्यान करताना त्याच्या अंतर्मनाला त्या मंदिराचा पत्ता कळाला होता. तो एक दैवी संकेत मानून तिथे आपल्याला यश मिळणारच असा ठाम विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला होता. पण आज त्या विश्वासाच्या ठिकऱ्या उडाल्यासारख्या झाल्या होत्या. कोणीतरी आपल्या आयुष्याबद्दलचं सत्य आपल्यापासून प्राणपणाने लपवून ठेवतं आहे असं वाटून त्याच्या मनात त्या अज्ञात शक्तीबद्दल थोडीशी चीड निर्माण झाली. तो सर्वस्व पणाला लावून जी गोष्ट शोधत आहे ती गोष्ट त्याला मिळू न देण्याचा कोणीतरी कट रचून ठेवला आहे या भावनेने त्याचा जबडा ताठरला आणि त्याने ओठ घट्ट मिटून घेतले. या रागाच्या भावनेने त्याच्या मनातली निराशा मात्र थोडी कमी झाली आणि त्याच्यातल्या दुर्दम्य ज्ञानपिपासेने पुन्हा डोके वर काढून शीणलेल्या त्याच्या शरीरात पुन्हा प्राण फुंकले. डोकं हलवून त्याने स्वत:ला वर्तमानात आणलं आणि त्याने विष्णुदासाकडे पाहिले. विष्णुदासाला फारसं दु:ख झालेलं दिसत नव्हतं. "त्या गोसावड्याने चंदन लावलं म्हणायचं. जीवनाचा अर्थ समजलेला माणूस भौतिक लाभासाठी असं ज्ञान दुसऱ्याला कसा देईल हे मला कळायला हवं होतं. " असं आणि अशा अर्थाचं आणखी काही तरी बडबडत विष्णुदासाने भोयांना कामाला लावलं. घटकाभरात सूर्यास्त झाला असता. त्याआधी थोडी साफसफाई करून झोपायची सोय करणे आवश्यक होते. भोई लोक कामाला लागले. जमीन थोडी स्वच्छ करून त्यांनी पथाऱ्या पसरल्या. जास्त वजन होउ नये म्हणून आणलेली थोडीच लाकडे मधल्या धुनीत टाकली. अंधार पडला की थंडी वाढणार होती तेव्हा ती लाकडे कामाला येणार होती. एवढं सगळं होईपर्यंत सूर्य पश्चिमेला टेकलाच होता. मग त्यांनी बरोबर आणलेली शिदोरी उघडली आणि थोडं थोडं खाउन घेतलं. जेवण झाल्यावर तर तो बराच ताजातवाना झाला आणि मघाशी आलेली निराशा बाहेरच्या संधीप्रकाशासारखीच त्याच्या मनात धूसर झाली. सर्व जण भिंतीला टेकून पाय पसरून बसले आणि मग त्याची आणि विष्णुदासाची पुन्हा चर्चा सुरू झाली."मला वाटतं असं दुसऱ्याकडून मला ज्ञानप्राप्ती होणार नाही. त्यासाठी मला स्वत:ला प्रयत्न करावे लागतील. पण काय करावे ते कळत नाही. ", विष्णुदास म्हणाला आणि त्याच्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहू लागला."हम्म, आपण तर पाहतच आहात की मी स्वत: अनेक ग्रंथ अभ्यासले, गुरू केले. सर्व धर्मांचं, तत्वज्ञानाचं अध्ययन केलं पण मला अजून खरं ज्ञान मिळालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला काही सल्ला देण्याचं मी धारिष्ट्य करू शकत नाही. ".विष्णुदासाने मान डोलावली आणि म्हणाला, " कधी कधी असं वाटतं की आपण उगाचच प्रयत्न करतोय. कित्येक लोक म्हणतात तसं देव खरोखरच असेल आणि त्यानेच आपल्या सर्वाना निर्माण केलं असेल. त्यानेच ही जगण्याशी रीत माणसाना सांगितली, चार वर्ण निर्माण केले, प्रत्येकाला त्याचं काम नेमून दिलं आणि लोकांनी त्या मार्गावरून ढळू नये म्हणून हे सगळं ज्ञान त्यांच्यापासून दूर ठेवलं. "अगदीच प्राथमिक पायरीवर असलेले विष्णुदासाचे विचार ऐकून तो चिडल्यासारखा झाला. तरीही संयम राखत तो म्हणाला, "असं आहे तर तो देव तरी कुठेतरी असेलच ना. आणि तपश्चर्येने तो प्रसन्न होत असेल तर या ज्ञानासाठी आपण तप केले तर ते ज्ञान नक्कीच आपल्याला मिळेल". "बरोबर आहे. आता परत गेलो की मी माझी सर्व संपत्ती या कार्यासाठी खर्च करणार. जगातल्या मोठमोठ्या ज्ञानी लोकांना आणि स्वत:लाही या कार्यात समर्पित करणार. "."ह्म्म", तो म्हणाला आणि आता अंधारून गेलेल्या अंतर्भागापासून केवळ राखाडी रंगाच्या एका छटेने आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या दाराबाहेर पाहत राहिला.हळू हळू वाऱ्याचा वेग वाढत होता आणि तापमान घटत होतं. आतला आणि बाहेरचा अंधाराचा काळा रंग समान होण्यापुर्वीच एका भोयाने दार आणि खिडकी बंद केली आणि धुनीमध्ये टाकलेली लाकडे चकमकीने पेटवली. धुनीच्या एका बाजूला तो आणि विष्णुदास आणि दुसऱ्या बाजूला भोई असे सगळे त्या ज्वाळांकडे पाहत आपापल्या विचारांत गुंगून गेले. अधूनमधून भोई एकमेकांमध्ये कुजबूजत होते पण तो आणि विष्णुदास मात्र पूर्ण शांत होते. थोड्याच वेळात सगळेच बसल्या जागी लवंडले आणि एक एक करीत हळूहळू निद्रेच्या आहारी गेले. त्याचेही डोळे आता जड झाले. त्याने विष्णुदासाकडे पाहिले तर तो मंद आवाजात घोरू लागला होता आणि त्याचं ते भव्य पोट श्वासाच्या तालावर वरखाली होत होतं. त्यानेही मग स्वत:ला निद्रेच्या अधीन केलं. घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने त्याला एकदम जाग आली. वाऱ्याच्या शक्तीने खिडकी सताड उघडली होती आणि त्यातून मोठा आवाज करीत वाऱ्याचे झोत गरागरा फिरत मंदिरात प्रवेश करत होते. दार विरूद्ध बाजूस असल्याने आणि आत उघडत असल्याने बंदच होते आणि आलेले वाऱ्याचे झोत दारावर आपटून गुरगुरल्यासारखा आवाज करत मंदिरात फिरत होते. तापमान इतकं उतरलं होतं की मंदिराचं शीतगृहात रुपांतर झालं होतं. त्याने डोळे उघडले खरे पण त्याला काहीच दिसलं नाही. खिडकी उघडी असूनही बाहेरून प्रकाशाचा एकही कण आत येत नव्हता आणि पिसाळलेल्या वाऱ्याने धुनीत पेटलेल्या आगीच्या लहानात लहान ठिणगीचाही निर्ममपणे जीव घेतला होता. त्याने अंदाजानेच विष्णुदासाच्या दिशेने हात लांबवला. विष्णुदासाला हलवावं म्हणून त्याने त्याच्या पोटावर हात ठेवला आणि तो चरकला. पांघरूण आणि अंगरख्यावरूनही विष्णुदासाचे पोट थंडगार मांसाच्या निर्जीव गोळ्यासारखे वाटत होते. तो चटकन उठून बसला आणि त्याने विष्णुदासाला गदागदा हलवले पण विष्णुदासाने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्याने विष्णुदासाच्या चरबीने झाकलेल्या गळ्यात बोटे रुतवली आणि तो जिवंतपणाची एकतरी खूण मिळतेय का ते पाहू लागला. काही क्षण शोधत राहिल्यावर तो एकदम स्थिर झाला आणि विष्णुदास मेला आहे हे सत्य शरीरात जळजळीत मद्य उतरावे तसे त्याच्या मनात उतरत गेले. दोन क्षण स्तंभित झाल्यासारखा तो बसून राहिला आणि मग एकदम काहीतरी सुचल्यासारखे रांगत रांगत धुनीवरून पलीकडे झोपलेल्या भोयांच्या दिशेने तो गेला. हलवून उठवण्यासाठी पहिल्या भोयाला हात लावला आणि एकदम डंख झाल्यासारखा मागे घेतला. भोयाचं शरीरही विष्णुदासासारखंच थंडगार पडलं होतं, विष्णुदास एक थंडगार मांसाचा गोळा होता आणि हा भोई थंड झालेलं लाकूड एवढाच काय तो फरक. इतर भोयांची परिस्थिती पाहण्याच्या फंदात न पडता तो ताडकन उभा राहिला. त्या थंडगार हवेतही त्याचे तळवे घामेजल्यासारखे झाले आणि काय करावे ते न सुचून तो तसाच उभा राहिला. आयुष्यात त्याने अनेक अनुभव घेतले होते पण अशा दबकत दबकत येउन गुपचूप झडप घालणाऱ्या मृत्युचे रूप त्याने पहिल्यांदाच एवढ्या जवळून पाहिले. क्षणभरच असा उभा राहिल्यावर प्रत्येकात असते त्या त्याच्यातल्या जगण्याच्या अंत:प्रेरणेने त्याचा ताबा घेतला. काहीही दिसत नसताना तो वळला आणि खिडकी बंद करण्यासाठी वाऱ्याच्या येण्याच्या दिशेविरूद्ध अंदाजाने चालू लागला.अंदाजानेच खिडकीपाशी जाउन त्याने दोन हातात दोन कवाडे धरली आणि बंद करण्यापुर्वी त्याने बाहेर पाहिले. आश्चर्याने तो तसाच उभा राहिला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे बाहेर काहीच दिसत नव्हतं. त्याला वाटलं तसं समोरचा पर्वत अंधुकही दिसत नव्हता. ना आकाश दिसत होतं ना दरी. बाहेर आणि आतमध्ये इतका सारखाच अंधार होता की केवळ खिडकीची कवाडे हातात आहेत म्हणून तो खिडकीत उभा आहे हे त्याला कळत होतं. त्या दोन पर्वतांनी मिळून त्या मंदिरापुरतं आकाश झाकल्यासारखं झालं होतं आणि काहीच दिसू नये अशा अंधाराचं थारोळं तिथे जमा झालं होतं. त्या दृष्याने(?! ) तो संमोहित झाल्या सारखा तिथेच खिळून उभा राहिला. हळू हळू त्याचं देहभान हरपलं आणि अंधारात न दिसणाऱ्या एका बिंदूवर त्याची नजर एकाग्र झाली. आजूबाजूच्या जगाचं भान सुटल्यासारखं होउन आपण अधांतरी अंतराळात आहोत की काय असं त्याला वाटू लागलं.डोळे मिटून ध्यान करतानाही होणार नाही असं त्याचं मन आज डोळे उघडे ठेउन एकाग्र झालं. इतरवेळीसारखं विचारांपासून अलिप्त होण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नव्हते. आता वाऱ्याचा आणि थंडीचा त्रास त्याला होत नव्हता आणि निवळशंख पाण्याचा स्थिर डोह असावा त्या प्रमाणे त्याचं मन निर्लेप झालेलं त्याच्या अंत:चक्षूना दिसत होतं. स्थिर झालेल्या त्याच्या मनावर हळूच एक विचाराचा तरंग उमटलेला त्याला दिसला, "खरंच अंधारामुळे काही दिसत नाही आहे की मी अंध झालोय? ".
तो विचार विरतो न विरतो तोच पाठोपाठ दुसरा विचारतरंग उमटला, "काय फरक आहे? नुसते निर्दोष डोळे म्हणजे दृष्टी नव्हे. दृष्टी प्रकाशावर अवलंबून आहे. श्वास प्राणवायूवर अवलंबून आहे आणि शरीर अन्नावर. तुझे शरीर या सृष्टीतील उपलब्ध घटक वापरून क्रिया करण्यासाठी निर्माण झाले आहे. या सृष्टीबाहेर तुझी ज्ञानेंद्रिये कुचकामी आहेतच पण या सृष्टीतल्याही काही गोष्टी तुझ्या आकलनापलीकडे आहेत".
क्षण दोन क्षण पुन्हा स्थिरतेत गेल्यावर पुन्हा त्याच्यातील अद्वैताचा संवाद चालू झाला.
"तू कोण? "
"मी म्हणजे तूच. पण तू कोण हे तुला कळाले तर मी कोण हेही तुला आणखी चांगले समजेल".
"ते कसे समजेल? "
"ते ज्ञान तुझ्यातच आहे. किंबहुना तू त्या ज्ञानाचाच भाग आहेस. "
पुन्हा काही काळ शांतता. जणू काही तो स्वत:च्याच डोळ्यात पाहून स्वत:च्याच मनाचा थांग शोधत असल्यासारखी.
"जर ते ज्ञान माझ्यातच आहे तर माझ्या ज्ञानेंद्रियाना का समजू शकत नाही? "
"कारण तुझी ज्ञानेंद्रिये त्यासाठी निर्माण झालेली नाहीत. "
"मग कशासाठी निर्माण झाली आहेत? काय प्रयोजन आहे माझ्या शरीराचं? माझ्या जिवंतपणाचं? "
"काहीच प्रयोजन नाही. ती कोणी मुद्दाम निर्माण केलेली नाहीत. आणि ज्याला तू जिवंतपणा म्हणतो ती केवळ एक अवस्था आहे. अनेक विकृतींपैकी एक. "
"विकृती? जिवंतपणा ही एक विकृती आहे? "
"होय. केवळ तू ज्याला जिवंतपणा म्हणतो तिच नव्हे तर या विश्वातला प्रत्येक कण ही एक विकृती आहे. तू मेला तरी ती विकृती संपणार नाही. तुला ज्या प्रकाशामुळे दिसतं तो प्रकाश म्हणजे एक विकृती आहे. जी हवा तू श्वासातून घेतोस ती हवा एक विकृती आहे. इतकंच काय ज्या पृथ्वीवर तू उभा आहेस ती पृथ्वी एक विकृती आहे. सूर्य, चंद्र, आकाशगंगा एवढंच नव्हे त्यांच्या दरम्यान असलेली पोकळीसुद्धा एक विकृती आहे. थोडक्यात हे विश्व म्हणजेच एक विकृती आहे. "
"मग प्रकृती काय आहे? "
"शून्य. प्रत्येक गोष्ट शून्यातून निर्माण होते आणि शून्यातच तिचा अंत होतो. ज्याप्रमाणे तुझ्या मनात एखादी इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेप्रमाणे तू वागला की ती इच्छा पूर्ण होते तसंच प्रत्येक गोष्ट शून्यातून निर्माण होते आणि पूर्ण होते. तुझी वासना शमली की तू म्हणतोस ती पूर्ण झाली. प्रत्यक्षात ती शून्य होते. शून्य म्हणजेच पूर्ण. "
"म्हणजे मी मेलो म्हणजे शून्य होणार? "
"तुझा जिवंतपणा शून्य होणार. तू आणि तुझा जिवंतपणा यात फरक आहे. जिवंतपणा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि मृत्यू ही दुसरी. मघाशी मी म्हणालो ना की तू मेला म्हणजे विकृती संपली असं नाही. तुझ्या शरीरातील द्रव्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक क्रिया करीत राहणारच. "
"म्हणजे ती नष्ट होणार नाहीत. तशीच या विश्वातली एकूण उर्जा अक्षय आहे असं माझ्या एका गुरुंनी मला शिकवल्याचं मला आठवतंय. "
"ते सत्य आहे पण सापेक्ष सत्य आहे. ते सत्य या विश्वाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. आणि जरी या या विश्वातली उर्जा अक्षय असली तरी या विश्वातल्या सर्व उर्जा-प्रतिउर्जांची, बलाबलांची आणि द्रव्य-प्रतिद्रव्याची बेरीज केलीस तर काय मिळेल? शून्य. मी म्हणालो ना की सर्व गोष्टी शून्यातून निर्माण होतात आणि शून्यात विलीन होतात. हे विश्व त्याला अपवाद नाही. "
"म्हणजे काही काळाने हे विश्व शून्यात विलीन होणार? आणि अस्तित्वहीन होणार? "
"होय. काही काळाने हे विश्वच काय खुद्द काळही शून्यात विलीन होणार. या विश्वातला कण न कण शून्यात विलीन होणार. "
"आणि त्यानंतर? "
"त्यानंतर, त्याआधी या सर्व कल्पना विश्वाच्या अस्तित्वाशी निगडीत आहेत. विश्व नसेल तेव्हा काळही नसेल. फक्त अनादी अनंत असे शून्यत्व असेल. "
"मग हे सर्व निर्माण कसे झाले? "
"म्हणूनच ती विकृती आहे. आणि ही विश्वरुपी विकृती कशी निर्माण झाली हे कोणालाच कधीच कळणार नाही कारण तिथेच काळाचा जन्म झाला आणि या विश्वातल्या प्रत्येक कणाचं अस्तित्व त्या नंतरचं आहे. "
"मग शून्याचं काय झालं? "
"शून्य आहेच. हे सर्व शून्य तर आहे. हे सगळं शून्यातून निर्माण झालं म्हणजे शून्यातून बाहेर पडलं असं नाही. हे सगळं अजून शून्यातच आहे आणि सगळ्यात शून्य व्यापून राहिलं आहे. तुला वाटत असेल की दुरून तू शून्याकडे पाहू शकशील तर तो भ्रम आहे कारण शून्याच्या बाहेर असणे ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. शून्य हेच पूर्ण आहे. पूर्ण हेच शून्य आहे. "
शून्य हेच पूर्ण आहे. पूर्ण हेच शून्य आहे या वाक्यांचे तरंग त्याच्या मनात लहरत जाउ लागले आणि इतकावेळ स्थिर असणाऱ्या त्या डोहात जणू भोवरा निर्माण झाला. त्याच्या पुर्वायुष्याचा चित्रपट त्याच्या मन:चक्षूंपुढून झरझर सरकू लागला. अनेक प्रसंगांचे तुकडे, कधी काळी ऐकलेली वाक्ये, त्याच्या गुरुंची प्रवचने वगैरे सगळ्याची सरमिसळ होउन मोठा कोलाहल झाला. तो तटस्थपणे तो सरकणारा चित्रपट पाहत राहिला आणि मग एकदम एका बिंदूपाशी येउन तो पट थांबला. एका औदुंबराच्या झाडाखाली बसलेला एक वृद्ध शिक्षक आणि त्याच्यासमोर बसलेली चार-पाच मुले त्याला दिसू लागली. त्यातच तो ही एक होता. बालपणातील पाठशाळेचा परिसर त्याने लगेच ओळखला आणि तो रोमांचित होउन ते चित्र निरखून पाहू लागला.
सर्व मुले मांडी घालून ताठ बसली होती आणि त्यांनी हात जोडले होते. क्षण दोन क्षण शांततेत गेल्यावर गुरुंनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली.
"ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नम:
ॐ शांती: शांती: शांती:"
ती प्रार्थना ऐकून जणू त्याच्या मनाचा सगळा भार उतरला. मन आणि शरीर पिसासारखं हलकं झालं. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो हळूहळू भानावर आला. स्वत:च्या शरीराची, हातात धरलेल्या खिडकीच्या कवाडांची त्याला जाणीव झाली. अजूनही समोर काहीच दिसत नव्हते पण त्याला आता त्याची फिकीर नव्हती. इतकावेळ उघडे असल्याने वाऱ्याने त्याचे डोळे चुरचुरत होते. दोन क्षण डोळे बंद करून तो उभा राहिला आणि मग हळुवारपणे त्याने डोळे उघडले. मग शांतपणे एक एक पाय उचलून त्याने खिडकीच्या सज्जात ठेवला आणि वाकून तो खिडकीत बसला. एकवार चारी बाजूना असणाऱ्या त्या अंधाररुपी पोकळीकडे त्याने पाहिले आणि मग एकदम हात पसरून स्वत:ला खालच्या खोल जाणाऱ्या दरीत झोकून दिले.
त्याला दर्शन देण्यासाठी तिथे मूर्तिमंत साकार झालेल्या शाश्वत अशा शून्यात त्याने स्वत:ला अर्पण केले. तो आता पूर्णत्वाच्या दिशेने निघाला होता.

No comments: