Saturday, June 6, 2009

बिच्चूची गोष्ट.

बिच्चू सकाळी ठरलेल्या वेळी जागा झाला तेव्हा नेहमीप्रमाणेच त्याच्या आजूबाजूला आई बाबा नव्हते. त्याना नेहमीच मालक-मालकीणबाईंच्या आधी उठावं लागे. जाग आल्याबरोबर बिच्चू छोट्या मालकीणबाईंच्या खोली कडे चालू लागला. किचनमधून जाताना त्याने आईकडे पाहिले तेव्हा ती ब्रेकफास्टची तयारी करत होती. तिने एकदा बिच्चूकडे पाहिले आणि पुन्हा आपल्या कामात गढून गेली. छोटासा बिच्चू तुरुतुरू चालत छोट्या मालकीणबाईंच्या खोलीच्या दाराशी पोचला. त्यांना उठवायची वेळ जवळजवळ झालीच होती. खोलीच्या दाराच्या बाजूला त्याचा हात पोचेल अशा उंचीवर नंबर पॅनेल होते त्यावर बिच्चूने सराईतपणे पासवर्डचे बारा आकडे पटापट दाबले. लोण्यातून सुरी जाताना होतो त्यापेक्षाही कमी आवाज करीत दार सरकले. बिच्चू आत आल्याबरोबर खोलीतले दिवे हळूहळू प्रखर होत गेले आणि दिवसासारखा स्वच्छ प्रकाश पडला. बिच्चूने रिमोट हातात घेऊन बटण दाबल्याबरोबर खिडकीसदृश दिसणाऱ्या मोठ्ठ्या टी. व्ही. च्या पडद्यावर छान डोंगर आणि त्यामागून उगवणाऱ्या सूर्याचे दृश्य दिसू लागले. छोट्या मालकीणबाईंचा रॉकिंग बेड हळूहळू झुलायचा थांबून स्थिर झाला. बेड शेजारी उभा राहून बिच्चू हळू आवाजात एक इंग्रजी बडबडगीत म्हणू लागला. दर थोड्या वेळाने त्याचा आवाज आणि गाण्याची लय वाढू लागली आणि शेवटच्या कडव्यापर्यंत तो आला तेव्हा खोलीभर बिच्चूचा आवाज भरून राहिला होता आणि त्याने जमीनीवर एका पावलाने ठेका धरला होता. आवाजाने छोट्या मालकीणबाई जाग्या झाल्या आणि बिच्चूकडे पाहून खुदकन हसल्या. छोट्या मालकीणबाई उठलेल्या पाहून बिच्चू गायचा थांबला आणि मग त्याने अलगदपणे त्यांना उचलून छोट्याशा व्हीलचेअरवर ठेवले. त्याला शिकवल्याप्रमाणे त्यांच्याशी बोबडं बोबडं काही तरी गमतीदार बोलत त्याने व्हीलचेअर बाथरूमकडे वळवली.
* * * * * * * * * * * *
बिच्चू त्या घरात आला तेव्हा त्याला काहीच माहित नव्हतं. तिथे आल्यावर त्याला आई-बाबांनी दत्तक घेतलं. मग मालक आणि मालकीणबाईंशी ओळख झाली. त्यांनी त्याला सगळं काम समजावून सांगितलं. मालकीणबाई दिवसभर कामात व्यग्र असत. त्या सरकारच्या भूमिगत शेती खात्यात कामाला होत्या. अर्थात भूमिगत शेती म्हणजे काय हे बिच्चूला कळालं नाही. मालकही दिवसभर कामात गुंतलेले असत. जमिनीच्यावर ५५ अंश तापमानात वाढू शकतील अशा वनस्पतींवर ते संशोधन करीत होते. घरात तर नेहमीच २२ अंश तापमान ठेवण्याची यंत्रणा कार्यरत होती मग ५५ अंशात वनस्पती का वाढवायच्या हे बिच्चूला कळालं नाही. त्याने आई-बाबांकडं पाहिलं. ते दोघेही स्थितप्रज्ञासारखे सरळ उभे होते. त्याना कधी काही प्रश्न पडला असेल असं त्यांच्याकडे पाहून वाटत नव्हतं. मालक, मालकीणबाई आणि छोट्या मालकीणबाई व्हीलचेअर का वापरतात असा साधा प्रश्न बिच्चूने विचारला होता तेव्हासुद्धा कितीतरी गोंधळून ते बराच वेळ एकमेकांकडे आणि बिच्चूकडे पाहत राहिले होते. आपले आई-बाबा आपल्याएवढे बुद्धिमान नाहीत हे बिच्चूला तेव्हाच कळालं होतं.
* * * * * * * * * * * *
छोट्या मालकीणबाईंची व्हीलचेअर ढकलत बिच्चू डायनिंग रूम मध्ये आला तेव्हा मालकीणबाई ब्रेकफास्ट संपवून ऑफिस सेक्शनकडे जायच्या तयारीत होत्या. छोट्या मालकीणबाईंना पाहून मालकीणबाई त्यांचे लठ्ठ गाल चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंकडे ढकलून हसल्या. "गुडमॉल्निंग श्वीटी! डिड्यू श्लीप वेल डार्लिंग? ईट वेल ऍण्ड देन गो टू ष्कूल हां? मम्मा नीडस टू गो टू ऑफिश बेबी. " असं त्या लाडे लाडे बोलत असताना बिच्चूने छोट्या मालकीणबाईंची व्हीलचेअर त्यांच्या अगदी जवळ आणली. मग त्यांनी आपला लठ्ठ आणि गोरा पण निस्तेज हात लांबवून छोट्या मालकीणबाईंचा लठ्ठ आणि गोरा पण निस्तेज चेहरा कुरवाळला. दोन मिनिटं छोट्या मालकीणबाईंकडे प्रेमाने पाहत राहिल्यावर त्या एकदम आईकडे वळून कोरडेपणाने म्हणाल्या, "लेटस गो. "आईने पुढे होऊन त्यांची व्हीलचेअर वळवली आणि ऑफिस सेक्शनकडे घेऊन गेली.मग इतकावेळ शांतपणे टेबलाच्या काचेत असलेल्या स्क्रीनवर काहीतरी वाचण्यात मग्न झालेल्या मालकांकडे छोट्या मालकीणबाईंनी मोर्चा वळवला."डॅडीऽऽ""अंऽऽ""कॅन आय नॉट गो टू ष्कूल टुडे? ""ह्म्म्म""इज दॅट अ येश डॅडी? ""अंऽऽ.. येस बेबी"छोट्या मालकीणबाईंनी बिच्चूकडे पाहून डोळे मिचकावले. अशा परिस्थितीत काय करायचं ते त्याला आता चांगलंच कळालेलं होतं.छोट्या मालकीणबाई मजेत कॅल्शियम व्हिटाक्रंचीज खात असताना बाबा मालकांची व्हीलचेअर घेऊन ग्रीनहाऊसच्या दिशेने जाताना तो पाहत राहिला. जाड चष्म्याच्या आडून मालकांचे डोळे आता व्हीलचेअरला जोडलेल्या स्क्रीनकडे लागले होते.
* * * * * * * * * * * *
ब्रेकफास्ट झाल्यावर बिच्चूने व्हीलचेअर स्कूल सेक्शनकडे वळवली तशी छोट्या मालकीणबाई ओरडल्या."नो ष्कूल टुडे. डिडंट यु हिअर व्हॉट डॅडी शेड? "" आय नो मॅम. बट यु कॅंट बंक द स्कूल. आय हर्ड व्हॉट युवर डॅडी सेड बट आय नो हि डिडंट मीन इट. ""हाव डू यु नो? हू टोल्ड यु? ""नोबडी मॅम. बट आय कॅन थिंक फॉर मायसेल्फ. "बिच्चूच्या आवाजात इतका यांत्रिकपणा होता आणि तो म्हणाला ते इतकं खरं होतं की छोट्या मालकीणबाईंनी हट्ट करायचा विचार सोडून दिला आणि फक्त आपले गाल फुगवून त्या जवळ येणाऱ्या स्कूल सेक्शनच्या दाराकडे डूम १२८ मधल्या इंपसारख्या हिंस्त्र नजरेने बघू लागल्या.
* * * * * * * * * * * *
छोट्या मालकीणबाईंना स्कूलमध्ये घेऊन जाण्याच्या बाबतीत बिच्चू नेहमीच काटेकोर असे. ते त्याचं कामच होतं हे तर खरंच पण त्याला स्वत:ला ही स्कूलबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं. स्कूलमध्येच त्याला त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. विशेषत: मानवी इतिहासाच्या तासाला त्याला सद्य परिस्थितीबद्दल आणि ती तशी होण्याच्या कारणांबद्दल बरीच माहिती मिळाली होती. सातशे वर्षांपुर्वीच्या दोन पायांवर चालणाऱ्या माणसांचे, हिरव्यागार बागांचे, नद्यांचे आणि समुद्राचे व्हिडिओ त्याने तिथे पाहिले. नंतर झालेली झाडांची कत्तल पाहिली. २१व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेला प्रलय, तापमानात होणारी वाढ, त्यातून आलेलं हिमयुग, ते संपवण्यासाठी माणसांनी केलेले अघोरी आण्विक प्रयोग आणि नंतरची शुष्क, तप्त पृथ्वी आणि वटवाघळांसारखा अंधाऱ्या बीळांमध्ये राहणारा माणूस हे सगळं त्याला तिथेच कळालं. त्यानंतर कित्येक वर्षं असं बंदिस्त आयुष्य जगून माणसं कमकुवत होत गेली. असं असूनही उपभोगवाद आणि आराम करायची वृत्ती न सोडल्याने सगळीकडे यांत्रिकीकरण होतच गेलं आणि माणसांच्या हालचाली कमी होत होत त्यांची चालण्याचीही शक्ती नष्ट झाली. जमिनीखाली शेती करून, पाण्याचा अतिशय नियंत्रित वापर करून माणसं कशीबशी तग धरून होती. एकेकाळी १० अब्जांवर पोचलेली जगाची लोकसंख्या आता १० कोटींवर आली होती. उपग्रहांद्वारे घेतलेल्या जुन्या फिल्म्समध्ये कोट्यवधी लोक तहान-भुकेने मरताना त्याने अचंब्याने पाहिले होते. त्यानंतर आता परत पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी चाललेले प्रयत्नही त्याने पाहिले. त्याला आणखी प्रश्न पडत होते पण ते तो पडद्यावर दिसणाऱ्या टीचरला विचारू शकत नव्हता. प्रश्न विचारण्याचीच काय तर शिकवलं जात असताना ते ऐकायचीही त्याला बंदी होती. हे सगळं त्याला कळतंय आणि मुख्य म्हणजे तो स्वतंत्र विचार करतोय हे कोणाला कळालं तर फार गहजब होईल हे त्याला पक्कं माहिती होतं.
* * * * * * * * * * * *
छोट्या मालकीणबाई थ्रो ऍण्ड कॅच खेळण्यात गुंगून गेल्या होत्या. बिच्चूने त्यांच्या व्हीलचेअरला बसवून दिलेल्या बॉक्समधले बॉल एक एक करून बॉल थ्रोअरने त्या भराभर वेगवेगळ्या कोनात फेकत होत्या आणि समोर उभा राहून बिच्चू ते बॉल झेलत होता. उंचीने छोट्या मालकीणबाईंपेक्षा थोडाच जास्त असला तरी बिच्चूची चपळता त्यांच्यापेक्षा कित्येकपटींनी जास्त होती. भराभर येणारे बॉल तो धावून धावून झेलत होता. क्वचितच एखादा बॉल त्याच्याकडून निसटत होता. त्याची धावपळ पाहून छोट्या मालकीणबाई हसून अधून मधून टाळ्या पिटत होत्या. आई-बाबांच्या तुलनेत बिच्चूच्या हालचाली खरोखरच फार वेगवान होत्या. आई-बाबांच्या आणि त्याच्या वयात जवळ जवळ तीस वर्षांचं अंतर असल्याने असेल पण त्याच्या तुलनेत आई-बाबांच्या हालचाली फारच मंद होत्या आणि त्यांचे सांधेपण फार दुखत असत. ग्रीनहाऊसच्या दमट हवेत काम करून करून बाबांचे सांधे तर फारच कुरकुरत. कित्येकवेळा काम संपवून छोट्या मालकीणबाईंना झोपवून स्वत: झोपायला गेल्यावर त्याने बाबांना सर्वांगाला कसलंसं तेल लावताना पाहिलं होतं. त्याची त्वचासुद्धा आई-बाबांच्या त्वचेपेक्षा तजेलदार आणि गुळगुळीत होती. आई-बाबांची त्वचा मात्र थोडी सुरकुतलेली, काही काही ठिकाणी खरबरीत झालेली तर काही काही ठिकाणी काळी पडलेली होती. बराच वेळ खेळून झाल्यावर छोट्या मालकीणबाई कंटाळल्या. "आय वॉंट टु गो टु डॅडीऽऽ", त्या म्हणाल्या.ग्रीनहाउसमध्ये जायचं नाही असं त्याला बजावलेलं होतं त्यामुळे त्याने तिकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांची व्हीलचेअर घेऊन गेम्स रूमकडे जाऊ लागला. मग मात्र छोट्या मालकीणबाई चवताळल्या आणि किंचाळू लागल्या. जोरजोरात डोकं हलवत आणि खुर्चीतल्या खुर्चीत अंग इकडे तिकडे टाकून देत "आय वॉंट टु सी डॅडी, आय वॉंट टु सी डॅडी" असा एकच धोशा त्यांनी लावला. तरीही दुर्लक्ष करीत जेव्हा बिच्चू त्यांना घेऊन गेम्स रूम मध्ये प्रवेशला तेव्हा मात्र त्यांनी मोठ्याने भोकाड पसरलं. इतर कोणत्याही नियमापेक्षा 'छोट्या मालकीणबाई रडल्या नाही पाहिजेत' हा नियम महत्त्वाचा असल्याने बिच्चूचा नाईलाज झाला.
* * * * * * * * * * * *
ग्रीनहाउसकडे जाणारे दार बिच्चूने उघडल्याबरोबर बाहेरून गरम हवेचा झोत आल्यासारखं झालं. छोट्या मालकीणबाईंनी वर मान करून जाड पांढऱ्या काचांनी बनलेल्या छताकडे पाहिले. बाहेरचे रणरणीत ऊन सरळ आत येउ नये म्हणून जाड काचा लावूनही ग्रीनहाउस बरेच उष्ण झाले होते. थोड्या अंतरावर कोपऱ्यात मालक व्हीलचेअरवर बसून काही तरी वाचत बाबाना सूचना देत होते आणि त्यांच्या पुढ्यात एक गुडघा टेकवून बसून बाबा मातीत काहीतरी करत होते. आजू बाजूला वाफ्यांमध्ये पाण्याचे पाईप टाकलेले होते. बिच्चू छोट्या मालकीणबाईंची व्हीलचेअर घेउन तिकडे जाऊ लागला. तेवढ्यात मालकांचे लक्ष त्यांच्या कडे गेले. एकदम घाबरेघुबरे होऊन मालक ओरडले, "व्हाय आर यू टु आऊट हिअर? गो इनसाईड, गो इनसाईड. बिच्चू टेक हर बॅक इनसाईड, शी वुईल गेट ब्लाईंड""नो नो नो", छोट्या मालकीणबाई ओरडू लागल्या पण तो पर्यंत बिच्चूने व्हीलचेअर वळवली होती. मग त्या भयंकर चवताळल्या आणि त्यांनी खाली वाकून पाण्याचा एक पाईप उचलला आणि खांद्यावरून मागे पाणी उडवले. कोणत्याही परिस्थितीत अंगावर पाणी उडू द्यायचे नाही असं बिच्चूला शिकवलेलं असल्याने तो चपळतेने बाजूला झाला पण पाणी उडून नेमके मागे बसलेल्या बाबांच्या अंगावर पडले आणि बाबा कोसळले.
* * * * * * * * * * * *
दिवसभराचा सगळा गोंधळ आणि धबडगा आटपून, बाबाना स्ट्रेचरवर नेताना पाहून आणि भेदरलेल्या छोट्या मालकीणबाईंना अंगाई ऐकवून झोपवून बिच्चू झोपायला आला तेव्हा आई आधीच झोपायच्या तयारीत होती. तिची झोपायची वेळ जवळ जवळ झालीच होती. शांतपणे उभ्या असलेल्या आईकडे मान वर करून त्याने पाहिले आणि विचारले, " बाबा मेले? ""होय", आई म्हणाली.तो आणखी काही तरी विचारणार होता पण त्याने आईचा हात तिच्या हनुवटीकडे जाताना पाहिला आणि तो समोर पाहू लागला.बाबांसारखं आपणही एक दिवस असंच मरणार का? आणि मरणार असू तर मग आयुष्यभर हेच काम करीत राहणार का? बाहेरचं जग कसं असेल? बाहेरच्या उन्हात आणि थंडीत आपण जगू? सगळे ज्याला स्वातंत्र्य म्हणतात आणि फार कौतुक करतात ते काय आहे? बाहेर एवढी मुबलक सौर ऊर्जा असताना आपण या लोकांच्या पुरवठ्यावर का अवलंबून राहावं? हे आणि असे अनेक विचार त्याच्या डोक्यातून झरझर सरकले.दोन तीन सेकंद तो तसाच समोर अंधारात लुकलुकत्या डोळ्यांनी पाहत राहिला.झोपायची वेळ झाल्यावर मात्र नाईलाजाने त्याने हनुवटीकडे हात नेला आणि हनुवटीखाली असलेलं 'स्टॅण्ड बाय'चं बटण दाबलं.त्याच्या डाव्या छातीवर लाल प्रकाशात चमकणारी "Biotronics Child Care Humanoid" अशी अक्षरं हळूहळू विझून दिसेनाशी झाली.

No comments: